उपनगर : भाजपा-शिवसेना युतीला राज्याच्या विकासासाठी निवडून दिले, मात्र दोन वर्षांपासून हे दोघे आपसात भांडणे करून नागरिकांचे मनोरंजन करीत आहेत, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.उपनगर येथे प्रभाग १६ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. प्रारंभी विखे-पाटील यांच्या हस्ते उपनगर मार्केट चौकातील अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगर मार्केट येथे झालेल्या जाहीरसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या सत्तेत असलेले भाजपा - शिवसेना ही एकमेकांवर कुरघोडी करण्यातच आपला वेळ घालवत आहे. सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना नेते म्हणतात हे जनतेचे सरकार नाही. राजीनाम्याची भाषा करणाऱ्या शिवसेना मंत्र्याच्या खिशात असलेले राजीनामे हे खिशातच राहणार आहेत. निवडणुकीनंतर हे पुन्हा एकमेकांसोबतच जातील आणि जनतेलादेखील याची पूर्ण कल्पना असल्याचे विखे-पाटील यावेळी म्हणाले.तीन वर्षांपूर्वी केंद्रात व दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपाची सत्ता आली. नोटाबंदी व काळा पैसा बाहेर काढून सर्वसामान्यांच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असे सुतोवाच भाजपाकडून करण्यात आले होते. मात्र एकाच्याही खात्यात एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही. नोटाबंदीच्या काळात भांडवलदारांचे काळ्याचे पांढरे झाले. मात्र सर्वसामान्य जनता यात भरडली गेली, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.
सेना-भाजपाच्या भांडणाने नागरिकांचे मनोरंजन:विखे पाटील
By admin | Published: February 17, 2017 9:58 PM