नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए) मोठ्या समाज घटकांत असलेला संभ्रम दूर करण्यात सरकारला अपयश आले आहे, असे प्रतिपादन भाजपचा मित्रपक्ष लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) अध्यक्ष चिराग पासवान यांनी केले आहे. ‘सीएए’वरून देशभरात आंदोलन पेटल्याच्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी हे वक्तव्य केले आहे.
वादग्रस्त विधेयकावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावण्याची मागणीही चिराग पासवान यांनी केली आहे. यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले, तसेच या पत्राच्या प्रती त्यांनी जारी केल्या. ‘लोजपा’मध्ये काही नेत्यांनी ‘सीएए’ला विरोध केलेला असला तरी पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहांत या कायद्याला समर्थन दिले आहे.चिराग पासवान यांनी सांगितले की, हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले असले तरी या कायद्याबद्दल देशात असंतोष कायम आहे. याबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची विनंती आम्ही सरकारला केली आहे.
‘एनआरसी’बाबत पासवान यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘एनआरसी’च्या बाबतीत आपला पक्ष मुस्लिम आणि दलित समुदायासह इतर सर्व वंचित घटकांच्या हितांचे पूर्ण संरक्षण करील. सामान्य माणसाच्या हिताच्या नसलेल्या कोणत्याही विधेयकाला लोजपा समर्थन देणार नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ६ डिसेंबर रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात पासवान यांनी म्हटले आहे की, या विधेयकाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे. त्यातील तरतुदींविरोधात विविध पातळ्यांवर आवाज उठत आहेत. त्यामुळे त्यावर विचार करण्यासाठी रालोआच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात यायला हवी. आमच्या मागणीवर भाजपने अजून विचार केलेला नाही, अशी खंत पासवान यांनी व्यक्त केली आहे.एनआरसीबाबत नागरिकांशी चर्चा करू : सीतारामनच्एनआरसी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम काही ठरलेले नाही, असे मत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा नागरिकांशी चर्चा करण्यात येईल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, छळामुळे जे पळालेले आहेत आणि ७० वर्षांपासून जे नागरिकत्वासाठी वाट पाहत होते त्यांना आता नागरिकत्व मिळणार आहे.च्केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, एनआरसीचा देशातील कोणताही नागरिक दुखावला जाणार नाही. कोणत्याही भारतीय नागरिकाला यामुळे नागरिकत्वापासून वंचित राहावे लागणार नाही.