नवी दिल्ली - राज्यसभेत हे विधेयक मांडले असता, शिवसेनेच्या संजय राऊतांनी या विधेयकावर भाष्य केलं आहे. हिंदुत्वावरून शिवसेनेला करण्यात येत असलेल्या लक्ष्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जो या विधेयकास समर्थन करणार नाही, तो देशद्रोही आणि जो विधेयकास समर्थन करेल तो देशभक्त. या विधेयकास समर्थन न करणारे, पाकिस्तानची भाषा बोलतायेत, अशी टीका सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केली जाते, असे म्हणत या टीकेचा समाचार राऊत यांनी घेतला.
राज्यसभेत बोलताना, ही पाकिस्तानची संसद तर नाही. जर पाकिस्तानची भाषा आपल्याला पसंद नाही, आपलं सरकार एवढं मजबूत आहे. मग, पाकिस्तानला संपवून टाका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेतील चर्चेवेळी म्हटले. आपल्या देशाचे मजबूत पंतप्रधान, मजबूत गृहमंत्री, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच, आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत.
आमच्या शाळेचे हेडमास्तर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आम्ही त्या सगळ्यांनाच आदर्श मानतो. मी सकाळीच वर्तमानपत्रात वाचले, की काश्मीरमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीही या नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध केला आहे. मग, ते देशद्रोही ठरतील का? असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत विचारला. तसेच, विरोध करणाऱ्या देशद्रोही म्हणणं चुकीचं असल्याचेही त्यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाची अग्निपरीक्षा सुरू आहे. शिवसेना आणि जेडीयूनं या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं भूमिकेत अचानक बदल केला असून, जोपर्यंत विधेयकासंदर्भात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेनेनं भूमिकेत बदल केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला आहे.