नवी दिल्ली : आमच्या राज्यांमध्ये अन्य देशांतील शरणार्थींना स्थान देऊ न आमची संस्कृती व अस्तित्व संपवू नका आणि त्यांना आमच्या राज्यांत आणून देशाचे नागरिकत्व देण्यासाठीचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ताबडतोब मागे घ्या, या मागणीसाठी ईशान्येकडील राज्यांतसुरू झालेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. त्यामुळे आसाम व त्रिपुरामध्ये केंद्र सरकारने लष्कराच्या तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पाठविले आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नागरिकत्व विधेयक रात्री राज्यसभेतही संमत झाले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात १0५ मते पडली. शिवसेनेच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला. त्याआधी आसामच्या काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आली. आसाम व त्रिपुरातील आंदोलनाने बुधवारी उग्र स्वरूप धारण केले. काही ठिकाणी आंदोलकांची पोलिसांशी चकमकही झाली. तिथे निमलष्करी दलाचे पाच हजार जवान पाठविण्यात आले आहेत.
त्रिपुरामध्ये दोन व आसाममध्ये लष्कराची एक तुकडी तैनात केली आहे. आसामच्या लखीमपूर, धेमाजी, शिवसागर, जोरहाट, तीनसुकिया, दिब्रुगढ, चरायदेव, गोलाघाट, कामरूप, कामरूप या जिल्ह्यांत आंदोलनाचा भडका उडाला असून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.लष्कराला पाचारण केल्याने स्थानिक लोक अधिकच संतापले असल्याचे वृत्त आहे. निमलष्करी दलाच्या काश्मीरमधील २० व देशाच्या अन्य भागातील ३० कंपन्यांना तातडीने ईशान्य भारतामध्ये पाठविण्यात आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटरचा वापर भावना भडकाविण्यासाठी होण्याची शक्यता असल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
विद्यार्थी व पोलिसांमध्ये चकमक
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थी व युवक अग्रभागी आहेत. आसाममध्ये सचिवालयाजवळ आंदोलक विद्यार्थी व पोलीस यांच्यात चकमक उडाली. सचिवालयाच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जमावाला ५०० मीटर अंतरावर रोखून धरण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड पाडताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमारही केला. तेव्हा विद्यार्थ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा पोलिसांवरच फेकल्या. दिब्रुगढमध्येही पोलीस व आंदोलकांमध्ये चकमक झाली.च्तेथील दगडफेकीत एक पत्रकार जखमी झाला. आंदोलनामुळे ईशान्य भारतात धावणाऱ्या १४ रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.
मुख्यमंत्री सोनोवाल अडकले विमानतळावर
आंदोलनामुळे मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल हेही काही काळ गुवाहाटी विमानतळावर अडकून पडले. तेजपूर येथून हेलिकॉप्टरने गुवाहाटीला आलेल्या सर्वनंद सोनोवाल यांच्या गाड्यांचा ताफा गुवाहाटीतील सर्व रस्ते आंदोलकांनी अडविल्यामुळे पुढे जाऊ शकत नव्हता. अखेर सुरक्षा दलांच्या मदतीने सोनोवाल ब्रह्मपुत्रा या शासकीय निवासस्थानी कसेबसे पोहोचले.