Citizenship Amendment Bill: दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी; काँग्रेसची नाराजी तर भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 09:52 AM2019-12-12T09:52:45+5:302019-12-12T09:53:22+5:30
एकीकडे काँग्रेसची नाराजी तर दुसरीकडे शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवरुन भाजपानेही शिवसेनेला टार्गेट केलं आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन गेले दोन दिवस संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु होती. यात शिवसेनेची भूमिका मात्र संभ्रम निर्माण करणारी राहिली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केल्याने या विधेयकाबाबत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. पण लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले.
बुधवारी नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावेळी लोकसभेत पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत सभात्याग करुन बाहेर पडली. शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेमुळे काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी शिवसेनेने घेतलेली भूमिका भविष्यात राज्यातील महाविकास आघाडीसाठी नुकसानकारक आहे असं सांगितले. शिवसेनेच्या या भूमिकेवर राहुल गांधी यांनीही अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेनेने घेतलेली भूमिका महाराष्ट्रातील आघाडीत निश्चित केलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या विरोधात आहे. आघाडीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते नाराज झाले होते. मात्र लोकसभेत जे झालं ते विसरा, राज्यसभेत आम्ही सुचविलेल्या पर्यायावर सरकारने प्रस्ताव स्वीकारायला हवा अशी सावध भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. राज्यसभेत शिवसेना विधेयकाच्या विरोधाने मतदान करेल अशी अपेक्षा काँग्रेसला होती. मात्र मतदानावेळी सभात्याग केल्याने काँग्रेसची नाराजी दूर झाली नाही.
एकीकडे काँग्रेसची नाराजी तर दुसरीकडे शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवरुन भाजपानेही शिवसेनेला टार्गेट केलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटलंय की, देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता,त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पाहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे सत्तेत राहूनही शिवसेनेची दोन्ही बाजूने अडचण होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.