गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून विरोध सुरुच आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. गुरुवारी गुवाहाटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोन जण मरण पावले आहेत. जमावाने चौबा आणि पनीतोला रेल्वे स्थानकांवर जाळपोळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आसामच्या लखीमपूर, धेमाजी, तिनसुकिया, डिब्रूगड, चराइदेव, शिवसागर, जोरहाट, गोलाघाट, कामरूपमध्ये आदी १० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवांवर लावलेले प्रतिबंध आणखी ४८ तासांसाठी वाढविले आहेत. आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आसाम व त्रिपुरामधील रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे प्रवक्ते शुभानन चंदा यांनी दिली. रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे गुवाहाटी, कामाख्या रेल्वेस्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. दिब्रुगढ येथील चाबुआ व तीनसुकिया जिल्ह्यातील पनितोला येथील रेल्वेस्थानकाला आंदोलकांनी बुधवारी रात्री आग लावली. या दोन्ही परिसरात रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या १२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवून त्यांच्या जागी मुन्ना प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यापूर्वी एसपीजीमध्ये कार्यरत होते. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जी.पी. सिंह यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द
दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचा धार्मिक छळ होतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान चुकीचे आहे अशी टीका केल्यानंतर त्याच्या दुसºयाच दिवशी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आपली भारत भेट रद्द केली आहे. गुरुवारपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार होता.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात म्हटले आहे की, या विधेयकामुळे संविधानातील मौलिक अधिकारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. धर्माच्या आधारावर एका गटाला वेगळे ठेवून अवैधरीत्या आश्रयास असलेल्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.