नवी दिल्ली : शेजारी राष्ट्रांमधून काही त्रासांमुळे भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे सोपवण्यात यावे, अशी विरोधी सदस्यांनी केलेली मागणी केंद्र सरकारला राज्यसभेत मान्य करावी लागली.हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी आले होते. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच बिजू जनता दलाचे सदस्य भर्तुहारी मेहताब यांनी हे विधेयक अतिशय महत्त्वाचे असल्याने ते घाईघाईने मंजूर करणे योग्य ठरणार नाही. त्यावर साधकबाधक चर्चा होणे गरजेचे असून, ते त्यासाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी केली. ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस), सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस) आणि मोहम्मद सलिम (मार्क्सवादी कम्युनिस्ट) या सदस्यांनी मेहताब यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला. आम्ही या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहोत. त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असल्याने चर्चा न करता विधेयक संमत करणे योग्य ठरणार नाही, असे मत मोहमद सलिमआणि सुदीप बंदोपाध्याय यांनीही व्यक्त केले. त्यावर सदस्यांचे हे म्हणणे असेल, तर सदर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यास काहीच हरकत नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नागरिकत्वाचे विधेयक चिकित्सा समितीकडे
By admin | Published: August 12, 2016 3:01 AM