ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - भारतविरोधी जिहादी संघटनांसाठी पाकिस्तानमधील कराची शहर मुख्य अड्डा ठरत आहे. या सर्व संघटनांना पाकिस्तान लष्कराचा पाठिंबादेखील मिळत आहे. ब्रुसेल्सच्या थिंक टँक 'इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप (ICG)'ने जाहीर केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दाव आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांसाठी कराची शहर मुख्य ठिकाण ठरत असून, या ठिकाणी जिहादी तयार करण्यासाठी मदरशांचा वापर केला जात असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
अहवालानुसार, पाकिस्तानधील कुख्यात दहशतवादी संघटना कराची शहरातील मालमत्तेचा वापर करतात. या संघटनांकडून मदरसे तसंच चॅरिटी ट्रस्ट चालवल्या जातात ज्यावर पाकिस्तान सरकार कोणताच आक्षेप घेत नाही. आयसीजीने आपला अहवाल 'पाकिस्तानः स्टोकिंग द फायर इन कराची' मध्ये नमूद केलं आहे की कशाप्रकारे धार्मिक, राजकीय आणि जिहादी संघटना कराची शहराला प्रेशर कूकर बनवत आहेत. पाकिस्तानी रेंजर्स या जिहादी आणि गुन्हेगारी संघटनांना चांगले जिहादी मानतात, आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही असं अहवालात म्हटलं आहे.
वरिष्ठ अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनुसार अनेक जिहादी मास्टरमाइंड जे कराची सोडून गेले होते. त्यांना आता शहर सुरक्षित वाटत असून पुन्हा माघारी आले असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. जेव्हा कधी काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढतो तेव्हा या संघटना कराचीमध्ये दाखल होतात असं एका अधिका-याने सांगितलं आहे.
'आम्हाला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने आम्ही काहीच करु शकत नसल्याचं', एका पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. कराचीत जिहादी मदरसे स्वतंत्रपणे चालवले जातात. या ठिकाणी रोजगार मिळत नसल्याने तरुण मदसशांमध्ये जातात, जिथे त्यांना पैसे दिले जातात. येथील बेरोजगार लोक जिहादला आपलं काम किंवा व्यवसाय समजतात असं अहवालात सांगण्यात आलं आहे.