ना बँडबाजा, ना वरात...अवघ्या ५०० रुपयांत झालं मेजर आणि न्यायाधीशांचं शुभमंगल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:46 PM2021-07-14T19:46:32+5:302021-07-14T19:47:51+5:30
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका कोर्टात शहर दंडाधिकारी शिवांगी जोशी आणि लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या अनिकेत चतुर्वेदी यांचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच लग्न मोठ्या थाटामाटात होत असल्याच्या अनेक बातम्या आपण आजवर वाचल्या आहेत. डोळे दिपतील असा थाटमाट विवाह सोहळ्यात असतो अशी उदाहरणं आजवर पाहत आलो आहोत. शेकडो लोक अशा लग्नासाठी निमंत्रित असतात. यात अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा समावेश असतो. पण मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका कोर्टात शहर दंडाधिकारी शिवांगी जोशी आणि लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या अनिकेत चतुर्वेदी यांचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण दोघांनी सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही कुटुंबातील सदस्य वगळता इतर कुणीही या लग्नासाठी उपस्थित नव्हतं. लग्नाचे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही कुटुंबीयांकडून एकूण मिळून ५ ते १० लोकच उपस्थित होते आणि लग्नासाठी केवळ वरमाला व मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती. इतर कोणथाही थाटमाट करण्यात आला नव्हता. दोघांनही ठरलेल्या वेळेनुसार आपल्या वाहनातून कोर्टात पोहोचले आणि विवाह नोंदणी केली. कुटुंबियांच्या उपस्थितीत वर-वधूनं एकमेकांना वरमाला घातल्या आणि कोर्टातच दोघांचा शुभमंगल सोहळा पार पडला. लग्नानंतर कोर्टात उपस्थित अधिकाऱ्यांनीही जोडप्याला आशीर्वाद दिले.
न्यायाधीश शिवांगी जोशी मूळच्या भोपाळच्या रहिवासी आहेत. शिवांगी यांचा विवाह मेजर अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी दोन वर्षांआधीच ठरला होता. पण कोरोनामुळे वारंवार मुहूर्त टळत होता. मेजर अनिकेत सध्या लडाखमध्ये तैनात आहे. तर शिवांगी यांची नियुक्ती धार जिल्ह्यात आहे. कोरोना काळात शिवांगी ड्युटीमध्येच व्यग्र होत्या. त्यामुळे लग्नासाठी सुट्टी घेणं काही जमत नव्हतं. अखेर कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीनं विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबीयांनाही यास मान्यता दिली आणि कोर्ट परिसरात कोणताही थाटमाट किंवा बँडबाजा, वरात न करता दोघं विवाह बंधनात अडकले.
"लोकांनी नियमांचं पालन करावं. कारण अद्याप कोरोना गेलेला नाही. लग्नात वायफळ खर्च टाळता यावा यासाठी आम्ही साध्या पद्धतीत विवाह करण्याचं ठरवलं होतं. मी आधीपासूनच अशा वायफळ खर्चाच्या विरोधात आहे. लग्नात वधू पक्षावर खर्चाचं ओझं तर पडतंच पण हा पैशांचा दुरुपयोग आहे असं मला वाटतं", असं शिवांगी जोशी म्हणाल्या.
लग्नानंतर दोघांनीही परंपरेचं पालन करत धारच्या प्राचीन धारेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि पूजा केली. या लग्नसोहळ्याला जिल्हाधिकारी आलोक कुमार सिंह, एटीएम डॉ. सलोनी देखील उपस्थित होते.