आठवडी बाजारात भजी तळणारी युवा नगराध्यक्षा, आई-वडिलांना लेकीचा अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:37 PM2022-11-24T20:37:27+5:302022-11-24T20:53:29+5:30
विशेष म्हणजे दीपमालाचे आई आणि वडिल येथील वार्ड क्रमांक १ मधून नगरसेवक राहिले आहेत.
मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील राणापूर नगरमधील एका लहानशा दुकानात ग्राहकांना चहा देणारी आणि तेथे भजे तळणारी एक २२ वर्षीय तरुणी पाहून नवल वाटणार नाही. मात्र, ही २२ वर्षीय युवती याच शहराची नगराध्यक्ष असल्याचे समजताच तुम्हाला आश्चर्य वाटेल. दीपमाला असे या युवतीचे नाव असून तिची आई प्रमिला हे दुकान चालवतात. आईला मदत म्हणून दीपमाला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी या दुकानी आपली ड्युटी करते.
विशेष म्हणजे दीपमालाचे आई आणि वडिल येथील वार्ड क्रमांक १ मधून नगरसेवक राहिले आहेत. म्हणजेच राजकारणाची पायरी आपल्या घरातून तिने चढली आहे. मात्र, आई-वडिलांच्या एक पाऊल पुढे जाऊन दीपमालाने नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळवली आहे. वयाच्या २२ व्या वर्षीच राणापूर नगरपरिषदेचे अध्यक्षपद भूषवले, विशेष म्हणजे तेही बिनविरोध. भाजपने दीपमाला यांना उमेदवारी दिली होती. तर, राणापूर नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणूनही दीपमालानेच नाव कोरले आहे.
दीपमालाची आई चहा आणि भज्यांचे दुकान चालवते. हे दुकानच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मूळ साधन आहे. याठिकाणाहून त्यांना दररोज २ ते ३ हजार रुपयांची मिळकत आहे. आठवडा बाजार दिनी म्हणजे शनिवारी याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यादिवशी आईला एकटीने दुकान सांभाळणे कठीण बनते, म्हणून दीपमाला आईच्या मदतीसाठी दर शनिवारी चहा आणि भज्याच्या दुकानी काम करते. तसेच, आईच्या सूचनेनुसार गरजेवेळीही त्या दुकानावर येऊन काम करतात.
दीपमाला ही तीन बहिण-भावांमध्ये सर्वात लहान आहे. नगरपालिकेची अध्यक्ष बनल्यापासून ती सातत्याने आपल्या वार्डात जाऊन नागरिकांशी संवाद साधते. त्याकामी तिचे वडिलही तिला मदत करतात. सरपंच बनल्यानंतरही अनेकजण बदलून जातात. पण, दीपमाला आजही तिच्या जुन्याच स्वभावानुसार वागत आहे. आजही ती घरी मदत करते, शेतीकाम करते आणि दुकानाही आईच्या मदतीसाठी जात असते, असे तिचे वडिलांनी सांगितलं.