ऋतुबदलगुलाबी थंडीने यंदा अल्पकाळातच नियोजित वेळेपूर्वी काढता पाय घेतला आहे. माघ महिना संपण्यापूर्वीच आणि वसंत ऋतूच्या आगमनापूर्वीच फाल्गून महिन्यासारख्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. आरोग्यदायी हिवाळ्यानंतर उन्हाळ्याकडील संक्रमणकाळाच्या प्रवासाचा हा संधीकाळ नेहमीप्रमाणेच त्रासदायक ठरणार याची चिन्हे दिसत आहेत. सध्या रात्री आणि पहाटेच्या थोड्या थंडीनंतर दिवसभर कडक उन्हाच्या झळा जाणवत आहेत. या काळात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या ऋतुसंक्रमणाच्या काळात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत असते. सर्दी, पडसे, ताप, खोकला, अशा त्रासांनी ग्रस्त मुलांची संख्या वाढली आहे. सुदैवाने गोवरासारख्या आजारांची लस शासकीय व खासगी वैद्यकीय स्तरावर बहुतांशी मुलांना दिली जात असल्याने गोवराचे रुग्ण पूर्वीसारखे साथीच्या स्वरूपात आढळून येत नाहीत. तथापि, कांजिण्याची लस शासकीय स्तरावर उपलब्ध नाही व खासगी स्तरावर काहीशी महाग असल्याने फार कमी प्रमाणात घेतली जाते. त्यामुळे गेली काही वर्षे या काळात कांजिण्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. लहान मुलांमधील कांजिण्या फारशा त्रासदायक नसल्या, तरी क्वचितप्रसंगी या आजारामुळे लहान मेंदूला व मोठ्या मेंदूला जंतूसंसर्ग होणे अशा तत्कालीन गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. कांजिण्या झालेल्या काही मुलांना भविष्यात मोठेपणी नागीणसारखे आजार उद्भवू शकतात. गालगुंडाची लस अल्प किमतीला उपलब्ध असूनही अज्ञानापोटी ही लस घेतली जात नाही. त्यामुळे यंदा गालगुंडाचे बालरुग्णही आढळून येत आहेत. ॲलर्जीमुळे होणारी सर्दी व दमा असणार्या मुलांनाही हा काळ त्रासाचा ठरतो. दुपारच्या उन्हाच्या तडाख्यामध्ये शीतपेये, आईस्क्रीम खाण्याचा मोह होतो. त्यामुळे कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रो यासारखे जलजन्य आजार उद्भवू शकतात. या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक यात्रांचे नियोजन असते. अशाप्रसंगी एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न तयार केले जाते. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असण्याची खात्री असत नाही. त्यामुळे उलटी, जुलाबाच्या उद्रेकाच्या घटना घडत असतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने तसेच ऋतुचक्रातील बदलांना जुळवून घेण्याची प्रक्रिया संथ असल्याने त्यांना याचा फटका जास्त बसण्याची शक्यता असते. मोठ्या मुलांना याचा त्रास वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा परीक्षांचा काळ असल्याने त्यांना आजारपणात आपला मौल्यवान वेळ गमवावा लागतो. दहावी, बारावीच्या अत्यंत स्पर्धात्मक बनलेल्या व करिअरची दिशा ठरविणार्या परीक्षांबाबत हा वेळ फार महत्त्वाचा ठरू शकतो.याबाबत पालकांनी थोडीफार सतर्कता दाखविल्यास बर्याच गोष्टी टाळता येऊ शकतील. आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा ते टाळलेले बरे. त्यामुळे लसीकरणामुळे टाळता येणारे टायफॉईड, गोवर, कांजिण्या, कावीळ, गालगुंड, इन्फ्लुएंझा यासारखे आजार वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळू शकतो. शिशिर ऋतूमध्ये वाढलेला कफ वसंतामधील उष्णतेने पातळ होऊन निघून जात असल्याने पचनक्रिया हलकी झालेली असते. त्यामुळे स्निग्ध, आंबट, तुरट असे कफ वाढविणारे पदार्थ टाळून पचण्यास हलके पदार्थ द्यावेत. पिण्याचे पाणी नेहमीच उकळून थंड करून घेण्याची काळजी घेतलेली बरी. किमान परीक्षा होईपर्यंत शीतपेये, आईस्क्रीम, बाहेरचे खाणे यांचा मोह टाळलेला बरा. त्यातून मुले आजारी पडलीच तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार केल्यास आजारपण रेंगाळण्याची भीती राहणार नाही.
सिटी टॉक....
By admin | Published: February 15, 2017 7:09 PM