नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत भारतात अंदाजे ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार आहे, असे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, सध्या देशात कार्यरत असलेल्या वैमानिकांची एकूण संख्या ९०७३ आहे.
डीजीसीएकडून एका वर्षात ७००-८०० व्यावसायिक पायलट लायसन्स (सीपीएल) जारी केले जाते. यामध्ये ३० टक्के सीपीएल अशा लोकांना दिले जाते. ज्यांनी कोणत्याही विदेशी संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे, असे हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने तीन विमानतळांवर सुविधा वाढविण्यासाठी आणि विकास कामांसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
छत्तीसगडमधील जगदलपूर विमानतळ सुधारित करण्यासाठी ४८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर अंबिकापूर विमानतळासाठी २७ कोटी तर बिलासपूर विमानतळावरील विकास व उन्नतीसाठी ३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. पण कोरोनाचा सर्वात मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.
आणखी बातम्या...
- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
- गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास
- आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस
- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन