Arvind Kejriwal ( Marathi News ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केली, या विरोधात सीएम केजरीवाल यांनी आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. CJI डीवाय चंद्रचुड यांनी केजरीवाल यांना विशेष खंडपीठाकडे जाण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी न्यायालयात हजर झाले. केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना CJI डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यांना न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या विशेष खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश दिले.
सुनावणीवेळी CJI चंद्रचुड म्हणाले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे विशेष खंडपीठ आजच तुमच्या प्रकरणावर सुनावणी करेल. यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी यांनी CJI यांच्यासमोर याचिकेचा उल्लेख केला होता आणि या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर तुम्ही तुमचे म्हणणे मांडावे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
सरन्यायाधीशांच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांचे वकील न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठात जाऊन अर्ज दाखल करतील. आता न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ ईडीच्या अटकेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचाही समावेश आहे. आता केजरीवाल यांना तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकेचा उल्लेख करावा लागणार आहे.
ईडीने गुरुवारी संध्याकाळी सीएम केजरीवाल यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. या काळात सीएम केजरीवाल यांचे दिल्लीतील निवासस्थान आणि इतर ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती.