नवी दिल्ली-
न्यायालयात न्यायाधीश जे काम करतात तो त्यांच्या कामाचा केवळ एक अंश असतो. पण त्यामागेही बराच वेळ न्यायाधीशांना द्यावा लागतो, अशी माहिती देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिली आहे. न्यायालयाच्या कामकाजावर बोलत असताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायालयांवर असलेल्या कामाच्या ताणाची वस्तुस्थिती मांडली. ते इंडिया टुडे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
"आम्ही जे सकाळी साडेदहा ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जे काम करतो तो फक्त आमच्या कामाचा एक हिस्सा असतो. प्रत्येक शनिवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आपला आदेश लेखी स्वरुपात आणण्याचं काम करतो. मग रविवारी तोच आदेश पूर्णपणे वाचला जातो. जो त्याला सोमवारी कोर्टात वाचून दाखवायचा असतो. त्यामुळे खरं पाहायचं झालं तर सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करत असतो", असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
ते म्हणाले की, अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट एका महिन्यात ८-९ दिवस आणि वर्षात केवळ ८० दिवस काम करतं. तीन महिने तिथं कोर्टाचं कामकाज बंद असतं. याचपद्धतीनं ऑस्ट्रेलियाच्या को४टात एका महिन्यात दोन आठवडेच सुनावणी होते. तर वर्षात १०० दिवसांपेक्षा कमीकाळ खंडपीठ काम करतं. तिथं कोर्टाला दोन महिने सुट्टी असते. सिंगापूरमध्ये कोर्ट वर्षातून केवळ १४५ दिवस काम करतं. पण ब्रिटन आणि भारतातील कोर्टात वर्षातून २०० दिवस कामकाज चालतं"
आठवड्याच्या कामकाजाचे सोमवार ते शुक्रवारचे दिवस न्यायाधीश वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावणीच गुंतलेले असतात. त्यामुळे आदेश लिहिण्यासाठी कामकाजाच्या वेळेत खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे शनिवार, रविवारीच न्यायाधीशांना आठवडाभर झालेल्या सुनावणीचा अभ्यास करुन निकाल लिहून काढावा लागतो, असंही सरन्यायाधीश म्हणाले. कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या प्रचंड असल्यांचीही कबुली त्यांनी यावेळी दिली. तसंच यावर तोडगा कसा काढता येईल यावरही काम सुरू असल्याचं ते म्हणाले. आता प्रलंबित खटल्यांची संख्या खूप कमी होऊ लागली असल्याचंही ते आवर्जुन म्हणाले.