CJI D. Y. Chandrachud: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर महत्त्वाचा निकाल देणारे देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. न्यायालयात वकिलांचे गैरवर्तन असो वा चुकीच्या पद्धतीने दाखल केलेली याचिका असो, सीजेआय चंद्रचूड रोखठोक मते मांडताना पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग एका सुनावणीदरम्यान घडला. यावेळीही चंद्रचूड यांनी वकिलांना चांगलेच सुनावले.
बार अँड बेंच वेबसाईटनुसार, सीजेआय चंद्रचूड यांनी वकिलांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेत त्यांना चांगलेच सुनावले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही काय करत आहात? तुमच्यासमोर एक महिला आहे. महिलांचा सन्मान करा. महिलांचा थोडा आदर ठेवा. तुम्ही तुमच्या घरी आणि घराबाहेरही असेच वागता का? तुम्ही माइक घेण्यसाठी हात तिच्याभोवती ठेवत आहात. परत जा आणि उद्या पुन्हा या, असे सांगत वकिलांना फटकारले.
यापूर्वीही वकिलांवर संतापले आणि नाराजी व्यक्त केली
CJI चंद्रचूड याचिकांवर सुनावणी घेत होते. तेव्हाच एका वकिलाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात खटल्यांची यादी योग्य पद्धतीने केली जात नाही. वकिलांनी केलेली रिट याचिका पाहून सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, ही कसली रिट आहे. आता १४० याचिकांवर सुनावणी घेतोय, असे सांगत वकिलाला खडे बोल सुनावले आणि रिट याचिका फेटाळून लावली होती.