नवी दिल्ली :
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी एका वकिलाला चांगलेच खडसावले. वकिलांनी लवकरची तारीख मिळण्यासाठी चलाखी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या अधिकाराशी खेळू नका. तुमची चलाखी येथे चालणार नाही, असे म्हणत संबंधित वकिलास सुनावले.
वकिलाने लवकर तारीख मिळावी यासाठी दुसऱ्या खंडपीठासमोर प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, हे प्रकरण सरन्यायाधीशांनी १७ एप्रिलसाठी आधीच सूचीबद्ध केले होते. वकिलाने लवकर तारखेसाठी प्रयत्न केला, ज्याला सरन्यायाधीशांनी नकार दिला. वकील मात्र, त्यासाठी तयार नव्हते, त्यावर सरन्यायाधीश संतापले.
सरन्यायाधीशांनी विचारले की, तुमची तारीख १७ एप्रिल आहे, तुम्हाला १४ एप्रिलची तारीख मिळवण्यासाठी दुसऱ्या खंडपीठासमोर सांगायची आहे का? यानंतरही वकिलाने नवी तारीख घेण्याचा प्रयत्न केला.
१७ म्हणजे १७...वकिलाने पुन्हा तारीख बदलण्याचा प्रयत्न केला आणि माफ करा, असे म्हणाला. त्यावर चंद्रचूड संतापून म्हणाले की, नक्कीच माफ करेन; पण तुम्हीही मला माफ करा. १७ म्हणजे १७. माझ्या अधिकाराशी खेळू नका.