CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यावर्षी नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीला महिनाभराचा काळ शिल्लक असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्या डोक्यात सुरू असलेल्या विचारचक्राबद्दल प्रथमच भाष्य केले. कोणते प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळत आहेत. ते काय विचार करत आहेत, याबद्दल चंद्रचूड बोलले आहेत.
भूतानमधील JSW स्कूल ऑफ लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. या पदवीप्रदान कार्यक्रमाला सरन्यायाधीश चंद्रचूड उपस्थित होते.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड काय म्हणाले?
८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, "मी दोन वर्ष देशाची सेवा केल्यानंतर या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताचे सरन्यायाधीश पद सोडेल. माझा कार्यकाळ संपतोय, त्यामुळं माझं मन भविष्य आणि भूतकाळातील शंका आणि चिंताबद्दल विचार करत आहे. मी अशा प्रश्नांवर विचार करतोय की, मी ते सगळं साध्य केलं आहे का, जे मी ठरवलं होतं?"
सरन्यायाधाशी चंद्रचूड पुढे म्हणाले, "इतिहास माझ्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसं करेल? मी काही वेगळं करू शकलो असतो का? न्यायाधीश आणि कायदे क्षेत्रात येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी मी कोणता वारसा ठेवू जाईन?"
कदाचित बहुतांश प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही -धनंजय चंद्रचूड
सरन्यायाधीश म्हणाले, "यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि कदाचित यातील काही प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाही. पण, मला माहितीये की, मागील दोन वर्षात मी सकाळी कटिबद्धता घेऊन उठतो की, मी माझ्या कामात सर्वश्रेष्ठ योगदान देईन आणि या समाधानासह झोपतो की मी माझ्या देशाची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे."
"मला यातच समाधान हवंय. जेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमता आणि ध्येयांवर विश्वास बसतो, तेव्हा परिणामांबद्दल फार उत्कंठा न ठेवणे सोप्पं होऊन जातं. तुम्ही प्रक्रियेला महत्त्व द्यायला सुरूवात करता", असे सरन्यायाधीश चंद्रचूड दीक्षांत समारंभात बोलताना म्हणाले.