CJI D. Y. Chandrachud: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासोबत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयात तसेच खंडपीठांसमोर महत्त्वाच्या याचिका सुनावणीसाठी येत आहेत. अशातच एका याचिकेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड एका ज्येष्ठ वकिलांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सोशल मीडियाच्या संदर्भात मत व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
अमेरिकन बार असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, प्रवास आणि तंत्रज्ञानामुळे मानवतेचा विस्तार झाला, परंतु आपण व्यक्ती म्हणून ज्यावर विश्वास ठेवतो तेही आपण स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे मानवतेची पीछेहाटही झाली आहे. हेच खरे तर आपल्या युगाचे आव्हान आहे. कदाचित हे तंत्रज्ञानाचे ‘उत्पादन’ असावे, असे चंद्रचडू यांनी सांगितले. तसेच जेव्हा राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हा इंटरनेट, समाजमाध्यमे नव्हती. आपण ‘अल्गोरिदम’द्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या जगात राहत नव्हतो. आता सोशल मीडियाच्या प्रसारामुळे, बीज म्हणून जे काही सांगितले जाते त्याचाच सिद्धांत होतो, ज्याची तर्कशुद्ध विज्ञानाच्या कसोटीवर चाचणी केली जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.
ट्रोल केल्या जाणाऱ्या टीकेपासून न्यायाधीशही सुटलेले नाहीत
दरम्यान, सोशल मीडियावर होणाऱ्या टीका-टिपण्यांवर भाष्य करताना सरन्यायाधीश म्हणाले की, सोशल मीडिया ट्रोल केल्या जाणाऱ्या टीकेपासून न्यायाधीशही सुटलेले नाहीत. प्रत्येक छोट्या कृतीसाठी आम्हाला आणि तुम्हालाही तुमचा दृष्टिकोन समजून न घेता कुणाच्या तरी टीकेला तोंड द्यावे लागते, असेही चंद्रचूड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विकास सिंह यांच्यावर चांगलेच संतापले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"