अलाहाबाद: गेल्या काही दिवसांपासून देशात घडणाऱ्या अनेकविध घटनांवर सर्वोच्च न्यायालय आणि त्यातील न्यायाधीश परखड शब्दांत मते मांडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पुन्हा एक असेच मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय प्रचंड हिंमतीचा होता, असा दाखला न्या. रमणा यांनी दिला आहे. (cji nv ramana says cancellation of indira gandhi election verdict of allahabad high court was courageous)
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इतिहासाचे अनेक दाखले न्या. रमणा यांनी यावेळी दिले. निवडणूक गैरप्रकार केल्याच्या आरोपांखाली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांचा निकाल हा अतिशय धाडसी निकाल होता व त्याने देशाला हलवून टाकले. यातूनच पुढे आणीबाणी लागू करण्यात आली, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले.
थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली
सन १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा निकाल दिल्यामुळे देशाला मोठा हादरा बसला. हा अतिशय धाडसी निर्णय होता व त्याचा थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली, असे म्हणता येऊ शकते. त्याच्या परिणामांबाबत मी आता चर्चा करू इच्छित नाही, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाला मोठा इतिहास आहे. देशातील महान कायदेतज्ज्ञ अलाहाबाद येथून देशाला लाभले, असेही न्या. रमणा यांनी यावेळी बोलताना नमूद केले.