नवी दिल्ली: गतवर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केल्यापासून वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणेने अद्यापही उसंत घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अविरत, अखंडपणे सेवा देत आहेत. मात्र, असे असूनही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होताना दिसत आहे. यावर न्यायपालिकांनी वेळोवेळी सरकारची कानउघडणीही केली आहे. अशातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. (cji nv ramana says centre govt not have serious concern about medical sector)
एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीशांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. सरकार वैद्यकीय क्षेत्राबाबत फार गंभीर असल्याचे चित्र नाही. याविषयावर सविस्तर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असेही सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले आहे. यापूर्वीही लोकशाही आणि निवडणुकांबाबत न्या. रमणा यांनी परखड भाष्य केले होते.
“निवडणुका म्हणजे अत्याचार दूर होण्याची हमी नाही”: सरन्यायाधीश
ड्युटीवरील डॉक्टरांवर हल्ले चुकीचे
आपली सेवा देत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर हल्ले होणे ही बाब अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. दुसऱ्यांच्या चुका, त्यांचे नैराश्य याचे परिणाम डॉक्टरांना भोगावे लागत आहेत. या क्षेत्राला सरकारकडून प्राथमिकता मिळत नसल्याचेच पाहायला मिळत आहे, या शब्दांत न्या. रमणा यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर हळूहळू फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अस्ताला चालली आहे. कॉर्पोरेट आणि गुंतवणूकदार परिस्थितीचा फायदा घेत असून, यासाठी डॉक्टरांना का दोष दिला जातो, अशी विचारणा न्या. रमणा यांनी यावेळी केली आहे.
“कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”
निवडणुका, टीका आणि विरोध हे लोकशाहीचा भाग
निवडणुका, टीका आणि विरोध ही लोकशाहीचा भाग आहेत. निवडणुकांच्या माध्यमातून तुमच्याकडे लोकप्रतिनिधी किंवा राज्यकर्त्यांना बदलण्याचा अधिकार असला, तरी त्यामुळे छळ, अत्याचार थांबतील वा दूर होतील याची हमी मिळू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या स्वाभिमानाचे संरक्षण होत नाही, तोपर्यंत लोकशाही अर्थपूर्ण होत नाही, असे न्या. रमणा यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.
“अपहरण केलेल्याला चांगली वागणूक देणाऱ्या आरोपीला जन्मठेप देता येणार नाही”: सुप्रीम कोर्ट
दरम्यान, कोरोना साथीच्या स्वरुपात जगाने अभूतपूर्व संकट पाहिले. या संकटाच्या प्रसंगी लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय केले आहे, याचा विचार आपण स्वत: करायला हवा. या कोरोनामुळे आणखी संकटे उभी राहू शकतात. या परिस्थितीत काय योग्य केले आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या ठरल्या, याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले होते.