नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,80,47,534 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,128 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,29,100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा (Corona Vaccine) एक डोसही पुरेसा आहे. अशा लोकांच्या शरीरात लसीचा पहिला डोस 10 दिवसांच्या आत अँटीबॉडी (Antibodies) तयार करतो. या अँटीबॉडी कोरोनाविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात अशी माहिती आता संशोधनातून समोर आली आहे.
बीएचयू झुलॉजी डिपार्टमेंट, आयएमएसबीएचयू विभागाच्या या संशोधनानंतर शास्त्रज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा एक डोसच देण्याबाबतचा सल्ला दिला आहे. बीएचयूचे झुलॉजी विभागाचे प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस लोकांवर एक संशोधन करण्यात आलं आहे. हे संशोधन कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या व्हायरसविरोधात नैसर्गिक अँटीबॉडीचा रोल आणि त्याच्या फायद्याची माहिती देते. कोरोना लसीचा पहिला डोस अशा लोकांमध्ये अगदी जलदगतीने अँटीबॉडी तयार करतो, ज्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे. तर, ज्यांना कोरोना झालेला नाही, अशा लोकांमध्ये लस घेतल्यानंतर तीन ते चार आठवड्यांनी अँटीबॉडी विकसित होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार
कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या महाभयंकर संकटात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे. जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.
5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 9 मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, 30 मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशभरात कोरोनाचे दररोज 20 हजार नवे रुग्ण आढळतील. तर, जुलै महिन्यापर्यंत दुसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरेल त्यांचा असा दावा आहे. सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.