शीलेश शर्मा, नवी दिल्लीसंसदेत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरुद्ध हक्कभंगाच्या नोटीसवरून प्रचंड गदारोळ झाला. अगुस्ता वेस्टलँड सौद्यावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध केरळमधील निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी केलेल्या टीकेवरून काँग्रेस प्रचंड नाराज झाली होती. परिणामी, पक्षाने हक्कभंग नोटीस देण्याचा निर्णय घेतला.लोकसभेत सदस्यसंख्या कमी असतानाही पक्ष एकजुटीने उभा होता. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे या मुद्द्यावर बोलण्याची तसेच पक्षाने दिलेली नोटीस स्वीकारण्याची मागणी केली. परंतु अध्यक्षांकडून ठोस उत्तर न मिळाल्याने काँग्रेस नेत्याने अध्यक्षांच्या आसनाजवळच धरणे देण्याची घोषणा केली. या घोषणेसोबतच सोनिया गांधी वगळता पक्षाच्या इतर सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जमिनीवर शांतपणे धरणे दिले. तडकाफडकी बनलेल्या काँग्रेसच्या डावपेचांतर्गत विरोध नोंदविण्याकरिता सभागृहातच धरण्यावर बसण्याचा निर्णय झाला. खरगे, वीरप्पा मोईली, ज्योतिरादित्य शिंदे, दीपेंद्र हुड्डा, अधीर रंजन चौधरींसह खासदार शांततेत धरण्यावर बसले आणि दुष्काळावरील चर्चाही सुरूराहिली. राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. तिथे काँग्रेसचे सदस्य शांताराम नाईक यांनी पंतप्रधानांविरुद्ध हक्कभंगाची सूचना दिली आहे.
मोदींविरुद्ध हक्कभंगाची नोटीस
By admin | Published: May 11, 2016 3:23 AM