कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख नेते भलेही सांगत असतील की, एनआरसी देशात लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; पण पश्चिम बंगाल भाजपने आपल्या एका पुस्तकात दावा केला आहे की, सीएए लागू झाल्यानंतर राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) आणण्यात येईल.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने राज्यव्यापी अभियान सुरू केले असून इंग्रजी, हिंदी आणि बंगालीमध्ये २३ पानांचे एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सीएएबाबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून, या कायद्याबाबतचे भय दूर केले जाऊ शकेल.या पुस्तकात असे प्रश्न आहेत की, यानंतर एनआरसी लागू करण्यात येईल? याची किती आवश्यकता आहे? एनआरसी आल्यानंतर आसामप्रमाणेच हिंदूंना डिटेन्शन सेंटरमध्ये जावे लागेल? याच्या उत्तरात म्हटले आहे की, होय, यानंतर एनआरसी असेल. केंद्र सरकारची अशी इच्छा आहे. या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, हिंदूंना एनआरसीमुळे नव्हे, तर विदेशी कायद्यामुळे डिटेन्शन सेंटरमध्ये जावे लागले. या पुस्तकात असेही म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि काँग्रेस सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या विदेशी कायद्यानुसार आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आले आहे.
सीएएनंतर देशात लागू होणार एनआरसी, पश्चिम बंगाल भाजपच्या पुस्तकात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:11 AM