ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा पुत्र असल्याचा दावा करणा-या एका व्यक्तीला मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.महादेवन यांनी तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला. जे. कृष्णमूर्ती असे या व्यक्तीचे नाव असून जयललितांच्या पोटी माझा जन्म झाला आहे. जयललिता आणि तेलगु अभिनेते शोभन बाबू यांचा मी मुलगा आहे असा दावा त्याने न्यायालयासमोर केला.
जयललितांचा पुत्र म्हणून आपला दावा मान्य करावा अशी त्याने न्यायमूर्तींना आर.महादेवन यांना विनंती केली. जयलिलता यांचे कुटुंबिय आणि अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांच्यापासून जीवीताला धोका असल्याने पोलिसांना आपल्याला संरक्षण देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणीही त्याने केली.
कृष्णमूर्तीने सादर केलेली कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे दिसत आहे. केजीच्या मुलासमोर देखील ही कागदपत्रे सादर केली तर तो सुद्धा ही कागदपत्रे बनावट असल्याचे सांगेल असे न्यायमूर्ती महादेवन म्हणाले. शनिवारी सकाळी चेन्नईच्या पोलिस आयुक्तांसमोर हजर हो आणि पडताळणीसाठी कागदपत्रे त्यांच्याकडे दे असे न्यायालयाने क्रिष्णामुर्तीला सांगितले. कोर्टाबरोबर खेळू नको असेही त्याला न्यायालयाने बजावले.