सर्वेक्षणात खडक असल्याचा दावा, बांधकाम करताना आढळले मातीचे डोंगर; नेमकं प्रकरण काय?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:51 AM2023-12-01T07:51:35+5:302023-12-01T08:02:14+5:30
Silkyara Tunnel: सिलक्यारा बोगदा बांधण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात येथे कठीण खडक असल्याचा दावा करण्यात आला होता.
उत्तरकाशी: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. दरम्यान, एम्स-ऋषिकेशच्या डॉक्टरांनी सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र याचदरम्यान सिलक्यारा बोगद्याबाबत केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालाची माहिती समोर आली आहे.
सिलक्यारा बोगदा बांधण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात येथे कठीण खडक असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बांधकाम सुरू झाल्यावर आतमध्ये मातीचे डोंगर असल्याचे आढळून आले. या बोगद्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले. यापूर्वी या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. बोगदा जेथे बांधला जाईल तेथे कठीण खडक असल्याचे सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तसेच यातून बोगदा बांधणे सुरक्षित ठरेल, असा दावाही करण्यात आला होता.
बांधकाम अभियंता प्रदीप नेगी आणि सुरक्षा व्यवस्थापक राहुल तिवारी यांनी सांगितले की, डीपीआरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात जे दावा करण्यात आला होता ते बांधकामात दिसत नाही. ते म्हणाले की, खडकांऐवजी सैल माती बोगदा बांधण्याच्या मार्गात येत आहे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. मोकळ्या मातीमुळे पुन्हा पुन्हा डेब्रिज पडतो. मात्र असे असतानाही हा बोगदा सुरक्षितपणे बांधला जात असल्याचे राहुल तिवारी म्हणाले.
अपघातामुळे बोगदा बांधण्याची प्रतीक्षा वाढली...
सिल्क्यरा बोगद्याचे काम जुलै २०२२मध्ये पूर्ण होणार होते, मात्र त्याला विलंब होत होता. आता अपघातानंतर आणि बचावकार्याला बराच वेळ लागल्याने बोगदा बांधण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. मात्र, त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांना आहे.
कामगारांवर झाली पैशांची बरसात
बोगदा बांधणारी नवयुग ही कंपनी आता बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे. याचवेळी सर्व मजुरांना दोन महिन्यांच्या पगारासह रजाही देण्यात येणार आहे. सर्वांत मोठी बाब म्हणजे या बचावकार्यात सहभागी झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनसही दिला जाणार आहे. उत्तराखंड सरकार बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये, हॉस्पिटलचा खर्च आणि प्रवासभाडे देत आहे.