नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला दिल्ली महापालिकेतील गोंधळ काही कमी होण्याचे नाव घेत नाही. स्थायी समिती निवडणुकीसाठी मतदान झाले. मात्र असा गदारोळ माजला की, पुन्हा एकदा आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी, नगरसेवक एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमसीडीमध्ये स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. मात्र त्या मतदानादरम्यान पुन्हा प्रचंड गदारोळ झाला. फेरमतमोजणी करण्याची मागणीही झाली. दरम्यान, पुन्हा एकदा भाजप आणि आपचे नगरसेवक आमनेसामने आल्याने हाणामारी सुरू झाली. हे व्हिडिओमधून समोर येत आहे, त्यात नगरसेवक एकमेकांना लाथा-बुक्क्या मारत आहेत. महिला नगरसेविकाही आक्रमक होताना दिसत आहेत.
दरम्यान, आज दिवसभर स्थायी समितीच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी एका मताच्या राजकारणाचा खेळ रंगला. मतदानापूर्वी भाजपाने आपचा नगरसेवक फोडला तर आपच्या महापौरांनी मतदानावेळी भाजपाचे एक मतच बाद ठरविले आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या सेक्रेटरी ऑफिसने हे मत अवैध ठरविण्यास नकार दिला. यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरु झाली.
आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर बनल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या निवडणुकीत त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना केवळ 116 मते मिळाली. निवडणुकीत एकूण 266 मतदार होते. मात्र, महापालिकेच्या स्थायी सदस्यांच्या निवडीबाबत सभागृहात गदारोळ सुरू झाला. बुधवारी महापौर उपमहापौर यांच्या निवडणुकीनंतर हा गदारोळ सुरु झाला. या गोंधळानंतर अनेक नगरसेवक सभागृहातच झोपले. आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी रात्री 1 वाजल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपवर गोंधळाचे गंभीर आरोप केले होते.