नवी दिल्ली : महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी दिल्ली महापालिका सभागृहात गोंधळानंतर आज आप व भाजपच्या नेत्यांनी निदर्शने करून एकमेकांवर आरोप केले. नायब राज्यपालांनी नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यावरून आप व भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. या गोंधळाने महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
शनिवारी आपच्या आमदार व नगरसेवकांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. तर भाजपच्या नगरसेवकांनी राजघाटसमोर निदर्शने केली. सभागृहात झालेल्या गोंधळाला भाजप व आपचे नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी केला. तर आप नेत्यांच्या मनात असलेल्या पराभवाच्या भीतीमुळे महापौरपदाची निवडणूक झाली नाही, असा आरोप भाजपने केला.