प्रतापगड: उत्तर प्रदेशातल्या प्रतापगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार संगम लाल गुप्ता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारल्याचा आरोप आहे. यादरम्यान भाजप खासदाराच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. भाजप खासदार प्रतापगडमधल्या सांगीपूरमध्ये एका आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात दोन्ही गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संगम लाल गुप्ता यांनी केला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिले आहेत.
नेमकं काय घडलं?प्रतापगडमधील सांगीपूरमध्ये गरीब कल्याण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला काँग्रेस नेते आणि माजी खासदार प्रमोद तिवारी उपस्थित होते. त्याचवेळी भाजप खासदार संगम लाल गुप्ता त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. दोघांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप खासदाराच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारल्याचा आरोप आहे. भाजप खासदाराची गाडीदेखील फोडण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.