पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू
By बाळकृष्ण परब | Published: February 10, 2021 07:43 AM2021-02-10T07:43:25+5:302021-02-10T07:46:41+5:30
Punjab Politics News : पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
मोगा (पंजाब) - पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान, पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून, यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे. Clash between Congress and Akali Dal party workers
गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला प्राथमिक उपचारांनंतर लुधियाना येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. आता अकाली दलाच्या या जखमी कार्यकर्त्यावर लुधियानामधील डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी मोगामधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये झाली आहे. तिथे अकाली दलाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर वाहन चढवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला.
जखमी कार्यकर्त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्याला लुधियानाच्या डीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेदरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. या घटनेनंतर आता परिसरात तणावाचे वातावरण आहे.