गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील एका न्यायालयात मंगळवारी पोलिस व वकिलांमध्ये तुंबळ मारहाण झाली. यात ११ हून अधिक वकील जखमी झाल्यानंतर एका स्थानिक पोलिस ठाण्याला आग लावण्यात आली.
गाझियाबादच्या राजनगर क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटकपूर्व जामीनशी निगडीत प्रकरणावर सुनावणी सुरू होती. न्यायाधीश व वकिलांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मारहाणीला सुरुवात झाली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलया घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पोलिस व वकील एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायाधीशांविरोधात इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणीवकिलांच्या एका समूहाने जिल्हा न्यायाधीशांविरोधात घोषणाबाजी केली. न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात १२ हून अधिक लोक जखमी झाल्याचा दावा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नाहर सिंह यादव यांनी केली. पूर्ण घटनाक्रम स्पष्ट व्हावा यासाठी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केलेल्या तक्रारीवर आठ वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.