पंजाबमधील गुरदासपूर येथे आज शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वे साठी आमच्या जमिनींचा जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे, तसेच या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी आधी नोटिसही बजावण्यात आलेली नाही, असा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, दिल्ली-कटरा एक्स्प्रेस महामार्गासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यावरून वाद सुरू आहे. गुरदासपूरमध्ये जमिनीचा ताबा घेण्यावरून शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता आमची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच जमिनीचा योग्य मोबदलाही देण्याचं नाकारलं, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, याविरोधात आंदोलन सुरू राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
याआधी ५ मार्च रोजी चंडीगडमध्ये आंदोलनावरून शेतकरी आणि पोलीस आमने सामने आले होते. शेतकरी संघटनांनी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. तसेच सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ५ मार्चपासून एक आठवडाभर आंदोलन करण्याचं नियोजन होतं. तसेच संपूर्ण पंजाबमधून येथे शेतकरी येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आंदोलक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना वाटेतच अडवले.