अजमेरमध्ये पायलट आणि गहलोत समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; जोधरपुरमध्येही पोस्टरवरून तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:58 AM2023-05-19T07:58:27+5:302023-05-19T07:59:08+5:30
एआयसीसी सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी अमृता धवन या राजस्थान भेटीवर येणार होत्या. त्यापूर्वीच दोन गटांतील तणाव हाणामारीवर आला होता.
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा काँग्रेसने सोडविल्याचे वाटत असताना तिकडे राजस्थानमध्ये पुढील विधानसभा निवडणूक आली तरी दोन नेत्यांमध्ये काही तिढा सोडविता आलेला नाहीय. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातून आता विस्तवही जात नाहीय अशी स्थिती आहे. विरोधक राहिले बाजुला परंतू या दोघांमध्येच राजकीय दुष्मनी सुरु झाल्याचा फटका येत्या काळात काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
या दोन गटांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पायलट आणि गहलोत समर्थकांमध्ये अजमेरमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसही दोन गटांतील लाथाबुक्क्या थोपविण्यास असमर्थ ठरल्याचे दिसत आहे. यामुळे पायलट आणि गहलोत यांच्यातील वाद आता टीका टोल्यांपुरताच राहिलेला नाहीय, तो आता लाथा बुक्क्यांपर्यंत गेलेला आहे.
एआयसीसी सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी अमृता धवन या राजस्थान भेटीवर येणार होत्या. त्यापूर्वीच दोन गटांतील तणाव हाणामारीवर आला होता. दुसरकडे जोधरपुरमध्ये देखील पोस्टरवरून दोन गटांत तणावाचे वातावरण आहे. काँग्रेसचे असंतुष्ट नेते सचिन पायलट यांच्यावर टीका करणारे होर्डिंग अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. राजस्थानमधील संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कथित घोटाळ्यावर ते 'गप्प' का आहेत, असा सवाल गहलोत गटाकडून करण्यात आला आहे.
पायलटनी 2020 मध्ये गेहलोत सरकारच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले होते. पायलट यांना मुख्यमंत्री पद हवे होते. परंतू, हायकमांडने त्यांना ते दिले नाही. गहलोत यांनी देखील पायलट यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली होती. यावरून राजस्थानमध्ये काँग्रेसमध्येच मोठा राजकारण सुरु आहे.