पटना : उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी तुटलेली असताना काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिहारमध्ये क्रिकेटरहून राजकीय नेते बनलेले कीर्ती आझाद यांच्या दरभंगा मतदारसंघावरील दाव्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे रालेसपाच्या उपेंद्र कुशवाहा यांच्यासोबतही काराकाट आणि बेतिया जागेवरून पेच निर्माण झाला आहे. आता हा वाद काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गेला असून 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांनी विश्वासू नेते अहमद पटेल यांना हा वाद सोडविण्यासाठी पाचारण केले आहे. शुक्रवारी सकाळी तुन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. यानंतरच बिहारमधील महायुतीचे भविष्य ठरणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेत तीन जागांवर पेच असल्याचे सांगितले. राजदने दरभंगा जागेऐवजी वाल्मिकीनगरची जागा ऑफर केली होती. परंतू काँग्रेसला ब्राम्हण उमेदवारासाठी बेतिया जास्त योग्य वाटले. बेतिया हे रालोसपाच्या वाट्याला आलेले आहे आणि ते ही जागा सोडायला तयार नाहीत.
यातच काँग्रेसने कौकब कादरी यांच्यासाठी काराकाटच मागणी केली आहे. येथे उपेंद्र कुशवाहा दावेदार आहेत. तसेच खासदारही आहेत. यामुळे राजदने काराकाटच्या बदल्यात त्यांना उजियापूरची जागा दिली आहे. तर अहमद पटेल यांनी दक्षिण बिहारमध्ये काँग्रेसकडून अल्पसंख्यांक उमेदवारासाठी काराकाटची जागा मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत लालू प्रसाद यादव यांच्यासोबत चर्चा सुरु होती. मात्र, तिढा सुटला नसल्याने शुक्रवारी सकाळच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.