श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकींत सहा दहशतवादी ठार झाले असून, दोन जवान शहीद झाले. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मोदरगाम चकमकीच्या ठिकाणी आढळले; तर रविवारी चिन्निगाम येथून चार मृतदेह ताब्यात घेतले. कुलगाम जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शनिवारी ही चकमक झाली. अमरनाथ यात्रा सुरू असताना हा हल्ला झाला असून, सुरक्षा वाढविली आहे. दहशतवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. या कारवाईबाबत बोलताना जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक आर. आर. स्वैन म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे मोठे यश आहे. दहशतवाद संपवण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सैफुल्लाह जट कोण?
घुसखोरीमागे सैफुल्लाह साजिद जट या अतिरेक्याचा हात आहे. जट हा पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील शांगमंगा गावचा असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तो इस्लामाबादमधील बेस कॅम्पमध्ये कार्यरत आहे. त्याची पत्नी भारतीय वंशाची आहे.
एनआयएकडून एकाला अटक
दहशतवादी आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणारे यांच्या हातमिळवणी प्रकरणात एनआयएने रविवारी सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी यास अटक केली आहे.
बाबा घरासाठी पैसे पाठवलेत; शहीद प्रवीणचे अंतिम शब्द
कुलगाम येथे चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्यानंतर ग्रामस्थांनी शनिवारची रात्री जागून काढली. प्रवीण यांनी शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यांची आई शालूबाई घरी नव्हत्या. त्यामुळे वडील प्रभाकरराव त्यांच्याशी बोलले. घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी पैसे पाठवल्याचे प्रवीण यांनी वडिलांना सांगितले. चकमकीत प्रवीण यांना मानेजवळ गोळी लागली.