बेंगळुरू : कावेरी जलविवादाला हिंसक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये गुरुवारीही आंदोलने सुरूच राहिली. तामिळनाडूतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आज शुक्रवारी बंदचे आवाहन केले असून तामिळनाडू प्रदेश काँग्रेसने समर्थन जाहीर केले आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी रेल्वेगाड्या अडविण्यात आल्या. शुक्रवारीही ‘रेल रोको’ चे आवाहन करण्यात आले आहे.बेंगळुरू, उडुपी, कोप्पल, चित्रदुर्ग, संगोली, मांड्या आणि म्हैसूर येथे रेलरोको करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या राज्यातील सर्व रेल्वेस्थानकांवर कलम १४४ लागू करण्यात आले असून बेंगळुरू येथे २५ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंध कायम राहील. गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या रेलरोकोचा लांब पल्ल्यांच्या गाड्यावर कोणताही परिणाम झाला नाही. प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, असे सूत्रांनी सांगितले.तामिळनाडूत आज शुक्रवारी भाजीविक्रेते आणि दूधविक्रेत्यांनी बंद आयोजित केला असून त्याला आमचा पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सू थिरूनावुक्करासार यांनी जाहीर केले.अज्ञात हल्लेखोरांनी चेन्नईतील इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर दगडफेक केल्यामुळे खिडक्यांची तावदाने फुटली.हल्लेखोरांनी घटनास्थळी काही पत्रके सोडली असून त्यात कावेरी जलविवादासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. चितोडजवळ कर्नाटकचा नोंदणी क्रमांक असलेले वाहन पेटवून देण्यात आले.