उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात गुरुवारी एका ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर स्टंट करून 'रील' बनवल्यामुळे मोठा अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रील' बनवण्यात व्यस्त असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने बाईकला धडक दिली, ज्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र जखमी झाला. त्यांनी सांगितलं की, १७ वर्षीय ललित हा त्याचा मित्र मुनेशसोबत झांझर गावात असलेल्या इंटर कॉलेजमधून परीक्षेचं हॉलतिकीट आणण्यासाठी बाईकवरून जात होता.
रबूपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुजित उपाध्याय यांनी सांगितलं की, एक ट्रॅक्टर चालक रस्त्यावर स्टंट करत असताना त्याच्या ट्रॅक्टरने बाईकला धडक दिली. भीषण अपघातात ललितचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र मुनेश गंभीर जखमी झाला.
उपाध्याय म्हणाले की, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मुनेशला गंभीर अवस्थेत बुलंदशहर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला.
ललितचे वडील सुंदर पाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि ट्रॅक्टर जप्त केला आहे, असं एसएचओने सांगितलं. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. आजकाल तरुणांना रील बनवण्याचं इतकं व्यसन लागलं आहे की, ते इतरांसोबत स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशा परिस्थितीत, रीलमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.