लहान मुलांमध्ये सध्या विविध प्रकारच्या ऑनलाईन गेमची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण त्याचा विपरित परिणाम देखील होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ऑनलाईन गेम फ्री फायर आणि पबजीच्या व्यसनापायी एका विद्यार्थ्याचं मानसिक संतुलन इतके बिघडवले आहे की आता त्यावर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी त्याचे पालक अनेक ठिकाणी चकरा मारत आहेत. राजस्थानमध्ये ही घटना घडली असून आतापर्यंतची ही चौथी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अलवर शहरातील मूंगस्का गावातील आहे जिथे एक जोडपं त्यांच्या दोन मुलांसह राहतं. पती रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत आहे आणि पत्नी घरोघरी जाऊन लादी पुसणं, भांडी घासणं हे काम करत आहे. 7 महिन्यांपूर्वी या कुटुंबात अँड्रॉईड फोन आला होता. हा अँड्रॉईड महिलेला देण्यात आला होता. शाळेतील मित्रांकडून मुलाला ऑनलाईन गेम पबजी आणि फ्री फायरबद्दल माहिती मिळाली.
आईचा मोबाईल घेऊन त्याने गेम खेळण्यास सुरुवात केली आणि तो रोज 7 ते 8 तास आणि नंतर 15 तास हा गेम खेळू लागला. त्याला या गेमची नंतर इतकी सवय झाली की त्याने खाणं-पिणं देखील बंद केलं. रात्री उशीरापर्यंत तो लपूनछपून ऑनलाईन गेम खेळायचा. घरचे ओरडले असता तो दोन वेळा आपलं घर सोडून पळून गेला होता. नातेवाईकांनी त्याला परत आणलं, सतत ऑनलाईन गेम PUBG आणि फ्री फायर खेळण्याच्या व्यसनामुळे त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं.
मुलगा घाबरू लागला, हात पाय थरथरू लागले, त्याला बोलण्यातही त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी मुलाला उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे नेलं, मात्र कोणताही फायदा झाला नाही. त्याच्या मज्जातंतूंवर ताण आल्याचं सांगण्यात येत आहे. मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबीय खूपच अस्वस्थ झाले आहेत. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. राजस्थानमध्ये ऑनलाईन गेमची ही पहिलीच घटना नाही, याआधीही चुरूमध्येही असा प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.