गुजरातमधील सुरतमध्ये आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे तिला परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, कुटुंबाचा असा दावा आहे की शाळेने मुलीला दिवसभर वर्गाबाहेर उभं करून शिक्षा केली, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि घाबरली. त्यानंतर तिने शाळेत जाणं बंद केलं. २१ जानेवारी रोजी तिचे आईवडील कामावर असताना तिने आत्महत्या केली.
मुलीचे वडील राजू खटीक म्हणाले, माझ्या मुलीला शाळेत परीक्षेला बसू दिलं गेलं नाही, तिला वर्गाबाहेर उभं केलं गेलं. घरी आल्यावर ती खूप रडत होती आणि मला सांगितलं की, फी न भरल्यामुळे तिला परिक्षेला बसू दिलं नाही. मी तिला सांगितलं की, मी पुढच्या महिन्यात फी भरेन. या घटनेनंतर मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला.
शाळेने मात्र कुटुंबीयांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हाला आज सकाळीच या घटनेची माहिती मिळाली. शाळेचा या घटनेशी काहीही संबंध नाही आणि फीमुळे तिने आत्महत्या केली असा दावा करणं चुकीचं आहे. शाळा विद्यार्थ्यांना फीबद्दल माहिती देत नाही. ती पालकांना याबाबत सांगते. आम्ही त्यांना फी भरण्यासाठी तारीख देतो असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.
शाळेतील शिक्षिका रंजनबेन अहिर यांनीही या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या "८ तारखेला मी विद्यार्थिनीला सांगितलं की तिची फी भरलेली नाही. आम्ही तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही. तिने मला पुन्हा फोन करायला सांगितलं, म्हणून मी फोन केला, पण तरीही तो फोन उचलला नाही. मी तिला परीक्षा देण्यास सांगितलं आणि तिने परीक्षा दिली." पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.