- ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 26 - वाहन नाकारल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरलेल्या जिल्हा रुग्णालयाला राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. भवानीपाटणा परिसतील जिल्हा रुग्णालयाने दाना माझी या आदिवासी व्यक्तीला मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी उपलब्ध करुन न दिल्याने त्यांना मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागला होता. आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन ते तब्बल 10 किमी चालत होते. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून लोकांनी संताप व्यक्त केला होता.
जिल्हाधिकारी ब्रुंधा डी यांनी याप्रकरणी चौकशी केली असता दाना मांझी कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याचा निष्कर्ष काढला आहे. उपलजिल्हाधिकारी सुकांत त्रिपाठी यांनी रुग्णालय कर्मचा-यांना क्लीन चिट दिली आहे. 'दाना मांझी यांनी पत्नीचं डेथ सर्टिफिकेही घेतलं नव्हतं', असं सुकांत त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.
दाना माझी यांच्या पत्नी अमंग यांना टीबीचा आजार होता. बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी रुग्णालयाकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी देण्याची विनंती केली. पण काहीच मदत मिळत नसल्याचं पाहून त्यांनी चादरीमध्येच पत्नीचा मृतदेह गुंडाळून घेतला आणि आपल्या घरचा प्रवास सुरु केला.त्यांची 12 वर्षाची मुलगीही सोबत चालत होती. रुग्णालयापासून तब्बल 60 किमी अंतरावर असलेल्या कालाहंडी गावात त्यांचं घर आहे. ओडिशा जिल्ह्यातील गरिब आणि मागासलेल्या गावांमधील एक त्यांचं गाव आहे.
'मी सर्वांकडे मदत मागितली पण कोणीच मला भीक घातली नाही. मी गरीब आहे, गाडीचा खर्च नाही उचलू शकत असं रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगितलं. पण आपण काहीच मदत करु शकत नाही सांगत त्यांनी हात वर केल्याचं', दाना माझी यांनी सांगितलं होतं. दाना माझी रस्त्यावरुन जात असताना सर्व लोक आश्चर्याने पाहत होते. नेमका काय प्रकार आहे कोणालाच कळत नव्हतं. 10 किमी प्रवास पुर्ण केला असताना एका स्थानिक वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिका-यांना फोन करुन माहिती दिली. जिल्हाधिका-यांना फोन केला असता त्यांनी उरलेल्या 50 किमीच्या प्रवासासाठी रुग्णवाहिकेची सोय करुन दिली.