जयपूर, दि. 14 - कथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पेहलू खान यांच्या मारेक-यांना राजस्थान पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. विशेष म्हणजे पेहलू खान यांनी मृत्यूपुर्वी या सहा मारेक-यांची नावे उघड केली होती. 1 एप्रिल रोजी दूधव्यवसायिक असलेले पेहलू खान गाई-गुरांची खरेदी करुन राजस्थानहून हरियाणाला चालले होते. यावेळी काही कथित गोरक्षकांनी गाईंची हत्या करण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप करत पेहलू खान आणि इतरांना जबरदस्त मारहाण केली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पेहलू खान यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला होता.
पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता. यावेळी पेहलू खान यांनी हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओम प्रकाश, सुधीर आणि राहुल सैनी यांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता पोलिसांनी या सहा जणांना क्लीन चीट दिली आहे.
अलवरचे पोलीस अधिक्षक राहुल प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सहा आरोपींवर पाच हजार रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. मात्र आता तपास पथकाने क्लीन चीट दिली असल्याने हे बक्षीस मागे घेण्यात येत आहे. जुलै महिन्यात अलवर पोलिसांकडून तपास काढत राजस्थान सीआयडीकडे तपास सोपवण्यात आला होता.
सीआयडीने अलवर पोलिसांना तपास अहवाल पाठवला असून, तपासादरम्यान आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालं नसल्याने आरोपी म्हणून त्याचं नाव काढण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे. गौशाळेचे कर्मचारी आणि काही पोलिसांचा जबाब घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पेहलू खान यांच्या मुलाने हा धोका असल्याचं सांगत आम्ही पुन्हा तपास करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी पेहलू खान यांच्या हत्येप्रकरणी इतर सात जणांना अटक केली होती. यामधील पाच जणांना जामीन मिळाला आहे.
काय आहे नेमकी घटना?हरियाणातील मेवात येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्यांना तस्कर समजून कथिक गोरक्षकांनी ठारच मारले. पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
पेहलू खान यांना एक म्हैस विकत घ्यायची होती. दुग्धउत्पादक शेतकरी असल्याने रमजान महिन्यात दुध उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण पेहलू खान यांना विक्रेत्याने त्यांच्यासमोर एका गाईचं 12 लिटर दूध काढून दाखवलं, आणि त्यांनी ती गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. विक्रेत्याने माफक किंमत सांगितल्याने पेहलू खान तयार झाले आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. पेहलू खान यांचा मुलगा इरशादही त्यादिवशी दुस-या पिकअप ट्रकमधून प्रवास करत होता. त्या ट्रकमध्ये दोन गाई आणि वासरं होती. "वडिलांना गाडीतून खेचून बाहेर काढत मारहाण करण्यात आली. त्यांना काठ्या, पट्ट्याने मारहाण सुरु होती. त्यांच्यासोबत इतर चौघांनाही मारण्यात आलं", असं इरशाद सांगतो. "घटनेनंतर अर्ध्या तासाने पोलीस पोहोचले", असल्याचा आरोप इरशादने केला होता. तोपर्यंत वडील पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. पेहलू खान हरियाणाचे रहिवासी होते. पशु मेळामधून त्यांनी या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी आपले वडील आणि इतरांकडील 35 हजार रुपयेही लुटून नेण्यात आल्याचा आरोप इरशादने केला.