Sukhbir Singh Badal Shri Akal Takht Sahib: शीख समाजाची सर्वोच्च धार्मिक न्यायालय असलेल्या श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांना दोषी ठरवत धार्मिक शिक्षा सुनावली. सुखबीर सिंग यांना अमृतसर येथील गुरूद्वारा साहिबमध्ये भांडी धुण्यासह इतर धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली. सुखबीरसिंग बादल यांच्यासह १७ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, यात माजी कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. आजपासून (३ डिसेंबर) सुखबीरसिंग बादल यांनी शिक्षा भोगण्यास सुरूवात केली. (sukhbir singh badal punishment)
श्री अकाल तख्त साहिबने सुखबीरसिंग बादल यांना ९३ दिवसांपूर्वी धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. २००७ ते २०१७ या काळात शिरोमणी अकाली दलाचे सरकार पंजाबमध्ये होते. या काळात केलेल्या चार चुकांच्या प्रकरणात श्री अकाली तख्त साहिबने दोषी ठरवले. ४ तास सुनावणी झाल्यानंतर हा निकाल दिला.
सुखबीर सिंग बादल यांच्यासह १७ जणांना धार्मिक शिक्षा का झाली?
माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या सरकारवर आरोप करण्यात आला होता की, २०१५ मध्ये पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब चुकीच्या वर्तनाप्रकरणातील दोषींना शिक्षा दिली नाही. श्रीगुरू गोविंद सिंहजी यांच्याप्रमाणे वेशभूषा करून अमृत शिंपडल्या प्रकरणात गुरमीम राम रहीम सिंहला माफी मिळवून दिली. ज्या काळात या घटना घडल्या, त्यावेळी सुखबीर सिंग यांचे वडील प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते. ३० ऑगस्ट रोजी श्री अकाल तख्त साहिबने धार्मिक गैरवर्तन केल्याचे घोषित केले होते.
श्री अकाल तख्त साहिबने शिक्षा सुनावल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल मंगळवारी सकाळी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आले. त्यांच्या गळ्यात शिक्षेचा बोर्ड होता. दारात त्यांनी सेवा बजावली. सुखबीर सिंग यांना भांडी घासणे, बूट साफ करणे, कीर्तन ऐकणे अशी शिक्षा देण्यात आली आहे. तर काही दोषींना शौचालये साफ करण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
सुखबीर सिंग बादल हे दोन वेळा पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. १६ वर्षे शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष राहिले. दिवंगत प्रकाश सिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर सिंग बादल यांना १३ वर्षापूर्वी दिलेला फख्र ए कौम किताब परत घेतला आहे.