नाला सफाई नव्हे, हात सफाई! मुस्लीम वस्त्यांमध्ये घाण पाणी रस्त्यावर मनपाप्रती प्रचंड रोष
By admin | Published: July 04, 2014 10:42 PM
अकोला : शहरातील नाला सफाईच्या मुद्याकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू झाला असतानाच, मुस्लीम वस्त्यांमध्ये नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याची परिस्थिती आहे. संबंधित प्रभागातील नागरिक नगरसेवकांना दोष देत असून, ही समस्या त्वरित निकाली न काढल्यास प्रशासनाला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा शुक्रवारी नगरसेवकांकडून देण्यात आला.
अकोला : शहरातील नाला सफाईच्या मुद्याकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू झाला असतानाच, मुस्लीम वस्त्यांमध्ये नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याची परिस्थिती आहे. संबंधित प्रभागातील नागरिक नगरसेवकांना दोष देत असून, ही समस्या त्वरित निकाली न काढल्यास प्रशासनाला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा शुक्रवारी नगरसेवकांकडून देण्यात आला. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील २५८ ऐवजी १४७ नाल्यांची झोननिहाय साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १८ लाखांची तरतूद करण्यात आली. तर उर्वरित ५० नाल्यांची सफाई प्रशासनामार्फत केली जात आहे. झोन निहाय नाला सफाईची कामे कंत्राटदारांना दिल्यानंतर १६ जूनपर्यंत नाला सफाईची कामे करणे भाग होते. सुरुवातीला मोठ्या तावात प्रशासनाने नाला सफाई सुरू असल्याचा दावा केला. तूर्तास जून महिना उलटून गेला असला तरी अद्यापपर्यंत नाला सफाईची कामे किती प्रामाणिकपणे करण्यात आली, याचा आयुक्तांनीच शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजानला सुरुवात झाली असून, नेमक्या याच प्रभागातील नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संबंधित नगरसेवक व मनपाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला आहे.बॉक्स..नाला सफाईत मलिदा!नाला सफाई सुरू केल्यापासून ते आजपर्यंत केवळ ७० नाल्यांची थातूर-मातूर सफाई झाली आहे. तर प्रशासनाच्या अखत्यारित ५० नाल्यांपैकी केवळ २८ नाल्यांची सफाई झाल्याची माहिती आहे. या मुद्यावर स्वच्छता विभागाची मंदगती लक्षात घेता, नाला सफाईतसुद्धा मलिदा लाटण्याची पूर्वतयारी झाल्याचे बोलल्या जात आहे.बॉक्स..या प्रभागातील नाल्या तुडुंबप्रभाग क्र.१, २, ३, ७, ९, १२, १३, १४, १५ मध्ये मुस्लीम बांधवांची सर्वाधिक संख्या आहे. नाला सफाई केवळ कागदोपत्री होत असल्याने ऐन रमजानच्या काळातच रस्त्यावर घाण पाणी साचत असल्याची परिस्थिती आहे.