मनपा कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवा
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
योजनांचा आढावा : आयोगाच्या सदस्या डॉ. लता महतो यांची सूचना
योजनांचा आढावा : आयोगाच्या सदस्या डॉ. लता महतो यांची सूचना नागपूर : महापालिकेच्या सर्व विभागात आठड्यातून एकदा दोन तास स्वच्छता मोहीम राबवा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता महतो यांनी शनिवारी केली. मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत स्वच्छ भारत अभियान, लाड समितीची नियुक्ती, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदी विषयाचा त्यांनी आढावा घेतला. आयुक्त श्याम वर्धने, अपर आयुक्त हेमंत पवार यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते. कार्यालयीन स्वच्छता व रेकॉर्ड निटनेटके ठेवण्याची काळजी घ्यावी, स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, शहराच्या विविध भागातील गरज विचारात घेता बाजारपेठेत पैसे द्या व वापरा, या तत्त्वावर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करा. या योजनेत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घ्या. तसेच शहरात प्रस्तावित असलेल्या २०सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी मनपाने जागा निश्चित करावी अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.उपायुक्त संजय काकडे, आरोग्य संचालक डॉ. मिलिंद गणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, फायलेरिया अधिकारी सुधीर फटींग, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेडे, डोमाजी भडंग यांच्यासह झोनचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)