नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान बदलले आहे. पहाटेपासून रिमझिम आणि हलक्या पावसाच्या हालचाली पहायला मिळत आहेत. IMD नुसार, पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीपासून दिलासा मिळेल.
हवामान खात्याच्या माहितीनूसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात हा बदल दिसून येत आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्ये आज म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या काही भागात गारपीटही होऊ शकते.
देशातील हवामान कसे असेल?
हवामान खात्याच्या (IMD) मते, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पंजाब, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. केरळमध्ये १ किंवा २ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ओडिशाच्या काही भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे वातावरण
देशाची राजधानी दिल्लीतही पाश्चिमात्य प्रभावाचा परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने (IMD) ४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीचे किमान तापमान ७ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. त्याचबरोबर कमाल तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.