जलवायु परिवर्तन (Climate Change) जगातील निम्म्या लोकसंख्येवर मोठे संकट घेऊन कोसळणार आहे. देशातील समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि हिमालयावर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC) च्या रिपोर्टनुसार आता उशिर करून चालणार नाही, नाहीतर जगासाठी परिणाम खूप धोकादायक असतील.
हवामान बदलल्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात. तसेच भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार असून उत्पादन कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आयपीसीसी अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेले अंजल प्रकाश म्हणाले की, येत्या वर्षभरात शहरी लोकसंख्येची संख्या झपाट्याने वाढणार आहे. पुढील 15 वर्षांत, देशाच्या लोकसंख्येपैकी 60 कोटी लोक शहरांमध्ये राहतील, जे सध्याच्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट असेल. देशाला 7,500 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी आणि गोवा यांसारख्या भागात अधिक उष्णता जाणवू शकते. या भागांना समुद्राची पातळी वाढल्याने पूर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर येथे चक्री वादळाचा धोकाही निर्माण होणार आहे.
युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही. तापमान 1-4 अंश सेल्सिअसने वाढले तर भारतात तांदूळ उत्पादनात 10 ते 30 टक्के, तर मक्याचे उत्पादन 25 ते 70 टक्क्यांनी घटू शकते, असे त्यात म्हटले आहे. आशियातील कृषी आणि अन्न व्यवस्थेशी संबंधित संकटे हळूहळू वाढतील, हवामान बदलासह संपूर्ण प्रदेशावर वेगवेगळे परिणाम होतील, असा इशारा अहवालात दिला आहे.
या अहवालात लोकांना त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या मार्गांचे वर्णन केले आहे. सुरत, इंदूर आणि भुवनेश्वर ही भारतीय शहरे हवामान बदलाला कोणत्या मार्गाने सामोरे जात आहेत याचाही या अहवालात उल्लेख आहे.