उत्तरकाशी - 50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत. 1968 साली हिमाचल प्रदेशमधील लाहोल येथील पर्वतरांगांमध्ये भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान अपघातग्रस्त झाले होते. चंदीगड येथून लेह येथे जात असलेल्या या विमानातून सुमारे 102 जण प्रवास करत होते. दरम्यान, या परिसरात गिर्यारोहण करण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांनी या अपघातग्रस्त विमानाचे काही अवशेष आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे मृतदेह शोधून काढले.
गिर्यारोहकांचे एक पथक 1 जुलै रोजी चंद्रभागा-13 या शिखरावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी गेले होते. या अभियानादरम्यान ढाका ग्लेशियरच्या बेस कॅम्पजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे सहा हजार 200 मीटर उंचीवर हे अवशेष सापडले. आम्हाला सुरुवातीला अपघातग्रस्त विमानाचे काही तुकडे सापडले. त्यानंतर अधिक शोध घेतला असता काही मीटर अंतरावर एका जवानाचा मृतदेह सापडला, अशी माहिती या पथकाचे प्रमुख राजीव रावत यांनी सांगितले. "आमच्या पथकाने येथे आढळलेले विमानाचे तुकडे आणि मृतदेहांची छायाचित्रे घेऊन त्याची माहिती 16 जुलै रोजी लष्कराच्या हाय ऑल्डिट्युट वॉर स्कूलला दिली. त्यानंतर या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे." असेही रावत यांनी पुढे सांगितले. एएन-12 या विमानाला 7 फेब्रुवारी 1968 रोजी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. चंदीगडहून लेह येथे निघालेले हे विमान प्रतिकूल हवामानामुळे वैमानिकाने लेहजवळून माघारी फिरवले होते. मात्र 98 प्रवासी आणि 4 चालक दलाचे सदस्य असलेले है विमान 7 फेब्रुवारी 1968 पासून बेपत्ता झाले होते.