ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 22 - उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती आराखडा आखण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे गाई तस्करीवर बंदी आणण्यासाठी सांगितलं आहे. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलिसांचा पहारा वाढवण्याचाही आदेश देण्यात आला आहे. प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबाजणी करण्याचा आदेश अधिका-यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी हे आदेश देण्याआधीच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
बेकायदेशीर मांस व्यापार रोखण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. मेरठमध्ये माजी बीएसपी नेता हाजी याकूब कुरेशी आणि माजी खासदार शाहिद अखलाक यांचा मांस गोदामांवर छापेमारी करण्यात आली आहे. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास सर्व बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं तसंच यांत्रिक कत्तलखान्यांवर बंदी आणण्याचं आश्वासन दिलं होतं.
UP CM Yogi Adityanath directed police officials to prepare an action plan to shut slaughterhouses; complete ban on cow smuggling: Sources.— ANI UP (@ANINewsUP) March 22, 2017
पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याने प्राणी तस्करी करणा-यांची धावपळ सुरु झाली आहे. वाराणसीमधील बडागाव आणि चंदोली येथील अलीनगरमध्ये तस्करांनी पश्चिम बंगालला घेऊन चाललेला जनावरांनी भरलेला ट्रक रस्त्यात सोडून पळ काढला. दुसरीकडे वाराणसीमधील कमलगदहा परिसरातील जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर कत्तलखान्याला टाळं ठोकलं आहे.
Uttar Pradesh: Three meat shops torched by unknown persons in Hathras, police registers case. pic.twitter.com/Ro0B2jhoJ6— ANI UP (@ANINewsUP) March 22, 2017
2012 रोजी हा कत्तलखाना बंद करण्यात आला होता. मात्र तरीही छुप्या पद्धतीने कत्तलखाना चालवला जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्ड, महापालिका अधिका-यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर कारवाई करत कत्तलखाना सील करण्यात आला आणि पाच डझनहून जास्त गुरांना ताब्यात घेण्यात आलं. कत्तलखान्याच्या मालकांकडे कोणतीच कागदपत्र उपलब्ध नसल्याने सील करण्यात आल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या शपथविधीनंतर काही वेळातच अलाहाबादमधील दोन कत्तलखाने सील करण्यात आले. तसंच कानपूरमधील काही कत्तलखाने बंद करण्यात आले.