लखनौ : राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती योजना तयार करा, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. गायींच्या तस्करीवर बंदी घालण्याचे आदेशही त्यांनी दिले. कोणत्या प्रकारचे कत्तलखाने बंद करण्यात येणार आहेत स्पष्ट केले नाही. मात्र भाजपच्या जाहीरनाम्यात बेकायदा कत्तलखाने बंद करण्यात येतील आणि यांत्रिक कत्तलखान्यांवर सरसकट बंदी घालण्यात येईल, असे म्हटले होते यापूर्वी गुरांच्या संख्येत प्रचंड घट झाली. यावरून तेव्हा त्यांची तस्करी सुरू होती, असे दिसते. आपला पक्ष राज्यात सत्तेवर येताच सर्व कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात येईल, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते. आज दिलेल्या आदेशात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले. बीफची निर्यात करणारा उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. दरवर्षी भारतातून ३२ हजार कोटी रुपयांच्या बीफची निर्यात होते. त्यात उत्तर प्रदेशातून होणारी निर्यातच १७ हजार कोटी रुपयांची आहे. देशात जितक्या म्हशी आहेत, त्यापैकी २८ टक्के म्हशी केवळ उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळेच तेथून बीफची निर्यातही अधिक होते. अशा स्थितीत कत्तलखाने सरसकट बंद केल्यास राज्याच्या महसुलावर मोठाच विपरित परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील लाखो लोकांचा रोजगारही बंद होईल. त्यामुळे बेकायदा कत्तलखान्यांवर अवश्य कारवाई करण्यात यावी. मात्र कायदेशीर कत्तलखाने बंद करू नयेत, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारने कोणते कत्तलखाने बंद करावेत, यासंबंधीच्या स्पष्ट सूचना न दिल्यामुळे प्रशासनातर्फे कायदेशीर कत्तलखानेही बंद करणे सुरू झाले आहे. (वृत्तसंस्था)
कत्तलखाने बंद करा!
By admin | Published: March 23, 2017 12:53 AM