अजमेर : ‘गरिबांना भ्रमित करा, त्यांना आशेला लावा हीच काँग्रेसची नीती आहे. त्याचा मोठा फटका राजस्थानच्या नागरिकांनाही बसला आहे. काँग्रेस प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारा पक्ष आहे,’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली. याचवेळी भारतात गरिबी संपण्याच्या अगदी जवळ आहे,’ असे मोदी म्हणाले.
अजमेरजवळील कायड विश्राम स्थळाजवळील जाहीर सभेला मोदी संबोधित करत होते. केंद्रात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले होते. देशातून गरिबी हटवण्याची हमी हा काँग्रेसचा गरिबांशी केलेला सर्वांत मोठा विश्वासघात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
काँग्रेस फक्त खोटे बोलतेमोदी म्हणाले, ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही मान्य केले होते की, काँग्रेस सरकारने १०० पैसे पाठवले तर ८५ पैसे भ्रष्टाचारात जातात. काँग्रेसला फक्त खोटे कसे बोलायचे हे माहीत आहे आणि ते आजही तेच करत आहेत. काँग्रेसनेच चार दशके ‘वन पेन्शन वन रँक’च्या नावाखाली माजी सैनिकांचा विश्वासघात केला.’ ‘आज जगभर भारताचे कौतुक होत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराला प्रथमच जाहीरपणे उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने आपल्या स्वार्थी विरोधासाठी राष्ट्रीय अभिमानाच्या एक क्षण वाया घालवला.