चेन्नई : कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावर शुक्रवारी तामिळनाडू बंदच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून आंदोलन व निदर्शने करणारे द्रमुक नेते एम. के. स्टालिन व खासदार कणिमोळी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे बंदचे आवाहन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केले होते व त्याला द्रमुकसह सर्वविरोधकांनी पाठिंबा दिला होता. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला व तो शांततेत पार पडला. दरम्यान, कावेरीच्या पाणी प्रश्नावरून स्व:तला गुरुवारी पेटवून घेतलेल्या व ९० टक्के भाजलेल्या युवकाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा युवक नाम तमिळार कच्ची या संघटनेचा होता. कोईमतूर, तिरुपूर आणि निलगिरी जिल्ह्यांत बंदमुळे सामान्य व्यवहारांवर परिणाम झाला होता. तिरुपूरमध्ये कपड्यांचे छोटे आणि मध्यम असे सुमारे २० हजार कारखाने बंद होते. द्रमुकचे खजीनदार स्टालिन यांनी येथे राजारथिनाम ते एग्मोर या मार्गावर मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे अडवून धरण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. द्रमुकच्या राज्यसभा सदस्य कणिमोळी यांनी अण्णासलाई येथे रस्ता अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदचा परिणाम तमिळनाडूतील केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयांवर झाला नाही. (वृत्तसंस्था)जयललितांचे कौतुक : जयललिता यांनी कावेरी पाणी प्रश्न अतिशय संयमाने हाताळला, असे कौतुकोउद््गार रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी काढले. राज्यातील रस्ते प्रकल्पांवर त्यांची जयललितांशी चर्चा झाली. त्यांच्याशी झालेली चर्चा ही प्रकल्पांशी संबंधितच होती, असेही त्यांनी म्हटले.
तामिळनाडूमधील बंद शांततेत, स्टालिनला अटक
By admin | Published: September 17, 2016 3:11 AM